सोलापूर; पाणीपुरवठा विभागाकडूूून उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरु

सोलापूर – उजनी धरणातील पाणीपातळी उणे 35 टक्‍क्‍यांखाली गेल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. धरणाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभारण्यात आली आहे. उन्हाच्या झळा आणि रात्रीची धग सोसत धरणाच्या खोल पाण्यात उतरून कामगारांनी 36 वीजपंपांच्या पाईर्प आणि वायरिंग जोडणीचे काम पूर्ण केले आहे. पुढील दोन महिने दोन वरिष्ठ अधिकारी आणि 15 कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत. शहराला उजनी ते पाकणी जलवाहिनी, औज ते सोरेगाव आणि हिप्परगा तलाव या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने उर्वरित दोन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी जलाशयावर महापालिकेचे पंपगृह आहे. जलाशयाच्या काठावर 15 मीटर खोलीची चर आहे. यातून पाणी उपसा केला जातो.

उजनी जलाशयाची पाणीपातळी उणे 35 टक्‍क्‍यांखाली गेल्यानंतर पंपगृहाच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जलाशयात आणखी पुढे जाऊन पाणी उपसा केला जातो. हे पाणी जॅकवेलच्या चरपर्यंत सोडण्यात येते. यंदा उजनी धरण 100 टक्के भरले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धरणातून नियोजनापेक्षा जास्त पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. परिणामी धरणाची पाणीपातळी लवकर खालावली. उजनी धरणातील पाणीपातळीचा अंदाज आल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने 15 एप्रिलपासून दुबार पंपिंगची तयारी सुरू केली होती. महापालिकेने या कामासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करुन ठेवली आहे.

10 अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी घेण्यात आल्यानंतर मंगळवारपासून नियमितपणे पाणी उपसा करुन जॅकवेलपर्यंत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. जून-जुलै महिन्यात पाउस पडल्यानंतर उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ होईल. तोपर्यंत दुबार पंपिंगचे काम सुरू राहणार आहे. पाउस पडल्यानंतर ही सर्व यंत्रणा पुन्हा हटविण्यात येणार आहे. ही सर्व यंत्रणा पुन्हा पाकणी येथील पंपगृहात आणून ठेवण्यात येणार आहे.


 

अशी आहे यंत्रणा –

– 50 अश्वशक्तीचे दोन पंप : एक पंप चालू, एक पंप पर्यायी
– 30 अश्वशक्तीचे चार पंप : दोन पंप चालू, दोन पंप पर्यायी
– 10 अश्वशक्तीचे 30 पंप : 20 पंप चालू, 10 पंप पर्यायी
– या पंपांसाठी स्वतंत्र वीज पुरवठ्याची यंत्रणा


आजवर पाच वेळा दुबार पंपिंग-
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, 2008 पासून आजवर पाच वेळा दुबार पंपिंग करावे लागले आहे. यापूर्वी 2016 मध्ये एप्रिल महिन्यात दुबार पंपिंग करण्यात आले होते. यंदा मात्र मे महिन्यात दुबार पंपिंग करावे लागले आहे. उजनी धरणाची पाणीपातळी उणे 50 टक्क्‌यांखाली गेली तर तिबार पंपिंग करावे लागेल. मागच्या वेळी 30 अश्वशक्तीचे दोन तर 50 अश्वशक्तीचा एक पंप वाढविण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.