उमेश सुतार
कराड – केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलात आणली. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कराड व पाटण तालुक्यात बहुतांश शेतकरी या योजनेपासून आजही वंचित असल्याचे चित्र आहे. याला ग्रामपंचायतीही तितक्याच कारणीभूत असल्यामुळे गावागावात ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतही शेतकऱ्यांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किसान सन्मान योजनेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे.
शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, आस्मानी संकट, वाढता उत्पादन खर्च या सर्व बाबींमुळे शेती हा पूर्णपणे बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलात आणली. मात्र याचा लाभ पुढारपण करणाऱ्यांनी तात्काळ घेतला. त्यामुळे खरे लाभार्थी मात्र अद्यापही या योजनेपासून वंचित राहिलेले पहावयास मिळत आहे.
कराड व पाटण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता सर्रास गावांमधून शेतकऱ्यांनी या योजनेविषयी माहिती विचारली अथवा ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी गेले असता आम्ही येथून कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण करून पुढे दिलेली आहे. तुम्ही तलाठी कार्यालयात जाऊन अधिक चौकशी करा. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तर तलाठी कार्यालयात याबाबत विचारणा केली असता गावच्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करा. अशी उत्तरे संबंधितांकडून दिली जातात.
ग्रामपंचायत प्रशासन तसेच तलाठी कार्यालय यांच्या टोलवाटोलवीचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनाकारण बसत आहे. यामुळे या कार्यालयात हेलपाटे घालून मेटाकुटीला आलेला शेतकरी हा नेमकी दाद मागायची कुणाकडे? या विवंचनेत असलेला पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत तसेच महसूल कार्यालयातील काम करण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची कोणतीच रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लाभार्थींनी विचारलेल्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदा झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अक्षरश: देशोधडीला लावले आहे. त्यातच शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने कराड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यामधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता आम्ही येथून कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण करुन पुढे दिलेली आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळावरुन घ्या. अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
तानाजी थोरात सर्वसामान्य शेतकरी