प्रसाद शेटे
मेढा – जावळी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या 20 तारखेला होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीतच रस्सीखेच होणार असल्याने तालुक्याचे या निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून नीलम जवळ तर राष्ट्रवादीकडून अनिल शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीची महाआघाडी असल्याने मेढ्यातील या निवडणुकीमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे मेढ्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यात शिवसेना-कॉंग्ररेस-राष्ट्रवादी अशी महाआघाडी असताना मेढ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे जनतेत संभ्रमावस्था पहावयास मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक हे भाजपवासी झालेले आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक असून राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपवासी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असलेले मात्र या पदांवर ठाम राहिले.
माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘पक्षाच कामं करायच नसेल तर राजीनामे द्या’ असा इशारा देऊनही राष्ट्रवादीचे नगरसेवक आपापल्या पदांवर ठाम राहिले मात्र या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वरवर शिवसेना – राष्ट्रवादी असणारी लढत प्रत्यक्षात मात्र भाजप विरुध्द शिवसेना यांच्यातच होताना दिसणार आहे.
मेढा नागपंचायतीमध्ये राष्ट्रवादी 7, शिवसेना 3, भाजप 1 तर अपक्ष 6 असे बलाबल आहे. मात्र अपक्ष कोणाला साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे कोण या स्पर्धेतून माघार घेणार? पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार? आणि कोण बहुमत सिद्ध करणार? याकड़े सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीवर वरिष्ठ पातळीवर लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांकडून होताना दिसत आहे.
मेढा नगरपंचायतीत होऊ घातलेली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच दिसत असली तरी अप्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना यांच्यातच खरी लढत आहे. कारण अनिल शिंदे कागदोपत्री राष्ट्रवादीचे नगरसेवक असले तरी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांचे समर्थक असून राज्यातील मंत्री मंडळातील पदे वाटप झाल्यावर ज्या नगरसेवकांनी पक्षाविरुध्द भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर कारवाई करून हकालपट्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेनेही या लढतीकड़े बघताना भाजप विरुध्द शिवसेना याच दृष्टीने बघावे.
दीपक पवार , जिल्हा परिषद सदस्य.