एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाचा दणका
नवीन ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश
पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मध्यवर्ती कार्यालयाच्या एका बदली आदेशानुसार वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच, त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळात वेगवेगळी कारणे सांगून आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याचे प्रकार सुरू असतात. तसेच, अनेक ठिकाणी ओळखीचा गैरफायदा घेऊन बदली केली जाते. मात्र, मंगळवारी अधिकाऱ्यांना मध्यवर्ती कार्यालयाने काढलेल्या एका बदलीच्या आदेशाने दणका दिला आहे. या आदेशाने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून नवीन ठिकाणी रुजू झाल्याचे अहवाल सादर करावे, असे आदेश दिले आहेत. या बदलीमुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दापोडी कार्यशाळेतील अधिकाऱ्यांवर संक्रात
एसटीच्या दापोडी कार्यशाळेमधील अंकुश रेणके यांची रत्नागिरी विभाग (सहायक कार्यशाळा अधिक्षक), प्रियदर्शनी वाघ दापोडीतून रायगड विभाग (विभागीय भांडार अधिकारी), अजितसिंह राजपूत दापोडीतून परळ आगार, मुंबई (आगार व्यवस्थापक), विजय सोनवणे दापोडीतून नाशिक विभाग (सहायक भांडारपाल), अमिर सय्यद दापोडीतून अहमदनगर विभाग (सहायक भांडारपाल), संजय यादव दापोडीतून ठाणे विभाग (एसटी बॉडी फिटर), मिलींद तिकोणे दापोडीतून सोलापूर विभाग (सहायक कारागीर) या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.