वाढीव जीएसटीवर वितरकही नाराज : दरवेळी मिळतात फक्त आश्वासने
पुणे – सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात वापरणाऱ्या फॅनवर गरजेपेक्षा जास्त जीएसटी आहे आणि तो शक्य तितक्या लवकर कमी करण्याची गरज असल्याचे फॅन उत्पादकांना आणि वितरकांना वाटते.
आपले गाऱ्हाणे सरकारपर्यंत मांडण्यासाठी फॅन उत्पादकाकडून “इफ्मा’ ही संघटना निर्माण करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले की, “सध्या फॅनवर तब्बल 18 टक्के जीएसटी आहे. तो 12% करावा, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केलेली आहे. मात्र, आमच्या मागण्यांबाबत विचार केला जाईल, असे सांगून वेळोवेळी मात्र या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते.’
सध्या फॅनवर जास्त जीएसटी असल्यामुळे त्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. परिणामी, आम्हाला नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करता येत नाही. त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास दर्जा पुरेसा नसल्यामुळे निर्यात पेठेत आम्हाला पुरेशा ताकतीने उतरता येत नाही, असे जैन यांनी सांगितले. अर्थमंत्रालाने कंपनी कर कमी केला आहे. त्यामुळे फॅनचे दर कमी होतील का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, या विषयावर आम्ही आता भाष्य करू शकणार नाही.
सर्व फॅन उत्पादक कंपन्या या विषयावर परस्परांशी समन्वय ठेवून आहेत. मात्र, कंपनी कर कमी केल्यामुळे आम्हाला तंत्रज्ञानात थोडीफार गुंतवणूक करता येणार आहे. भारतातील फॅन उद्योग साधारणपणे 9 हजार कोटी रुपये आहे. यातील 70 टक्के उद्योग औपचारिक क्षेत्रातील आहे. त्यामुळे सर्व कर व्यवस्थित भरले जातात, असे त्यांनी सांगितले. भारतात मंदी असल्याचे बोलले जाते मात्र या उद्योगातील वाढ गेल्या तीन वर्षांत 9 टक्के दराने होत आहे. सरकारने रिअल इस्टेट क्षेत्राला बऱ्याच सवलती दिल्यामुळे आता घरबांधणी वाढण्याची शक्यता आहे. जर घरांची विक्री वाढली तर फॅनची विक्री वाढण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.