मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि नाटय-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी वुद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-अभिनेते महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.
अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. अंबर कोठारे यांनी नोकरी करण्यासोबत रंगभूमीचीदेखील सेवा केली आहे. इंडियन नॅशनल थिएटर प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकं सादर केली आहेत. “झोपी गेलेला जागा झाला’ या त्यांच्या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले आहेत. नाटकात अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांची निर्मितीही केली आहे.
महेश कोठारे यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला “धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते.
महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमात अंबर कोठारे यांचा सक्रिय सहभाग होता. “दे दणादण’ या चित्रपटातही अंबर कोठारे यांनी खलनायकाची भूमीका साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
“झुंजारराव’ नाटकामधील अंबर कोठारे यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे “जेथे जातो तेथे’. या नाटकात दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.
अभिनयाची आवड जोपासत अंबर कोठारे यांनी बॅंकेत नोकरीदेखील केली आहे. नोकरी सांभाळत त्यांनी रंगभूमीची आवडदेखील जोपासली. अंबर कोठारे यांच्या निधनाने महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.