खराडी – खराडी येथील ईॲान आयटी पार्क जवळील गेरा ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या “फॅमिलिथॉन” मध्ये विविध वयोगटातील नागरिक व विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी सहभाग घेत “आरोग्य शक्ती”ची एक धाव घेतली.
शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्र्वर कटके तसेच युवा नेते सुरेंद्र पठारे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात फॅमिलिथॉनचा शुभारंभ आज पहाटे ५:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या मॅरेथॉनमध्ये ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी.) अशा विविध टप्प्यात महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये हजारो नागरिक आरोग्य संपन्नतेसाठी धावले. शेकडो स्पर्धकांनी धाव पूर्ण करीत “रन फॉर फिट फॅमिली”चा संदेश दिला. यावेळी सदर स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकांना ट्रॉफी, स्मार्ट वॉच अशी बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे या फॅमिलिथॉन मध्ये अपंग आणि मोठ्या संख्येने लहान मुलं देखील सहभागी झाले होते. तसेच आलेल्या सर्वांनी हलगीच्या तालावर ठेका धरत मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद लुटला, अशा या आगळ्यावेगळ्या फॅमिलिथॉनचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी ज्ञानेश्र्वर कटके आणि सुरेंद्र पठारे यांचे आभार व्यक्त केले.
रन फॉर फिट फॅमिलीचा संदेश देणासाठी फॅमिलिथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेस नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत उत्स्फर्तपणे सहभाग ही घेतला. याबद्दल सर्व वाघोली व खराडी परिसरातील नागरिकांचा आभारी आहे. – ज्ञानेश्र्वर कटके, जि. प.सदस्य (स्पर्धा आयोजक)