सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून नवीन वाद उफाळला आहे. शरद पवार यांच्या आधीच स्मारकाचंं अनावरण करण्याचा इशारा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिल्याने सांगलीत कमालीचा तणाव निर्मान झाला आहे.
विजयनगर भागातील या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात 2 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. परंतु त्याआधीच म्हणजे आज, 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आहे. 2 एप्रिलपर्यंत स्मारक परिसरात संचारबंदी बरोबरच कडेकोट बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्या तैनात केल्या गेल्यात. यामुळे स्मारक परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
शिवाय स्मारकाच्या चारही बाजू बाजू लोखंडी पत्र्याने झाकल्या आहेत.
आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊन स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं. पोलिसांनी आणि प्रशासनाने आम्हाला अडवू नये, जर संघर्ष होऊन अनुचित प्रकार काही घडला तर त्याला तेच जबाबदार असतील, असंही ते म्हणाले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विजयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारले आहे. अडीच कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडले होते. अखेर यंदा महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचे निश्चित केले आहे.