विनायक निम्हण स्मृती करंडक
पुणे – सनी स्पोर्टस किंगडम, सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत फाल्कन्स, एसपीजे क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात एसपीजे क्लब संघाने लौकिक फुटबॉल अकादमी संघाचा 2-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच एसपीजे क्लब संघाच्या खेळाडूंनी आक्रमक भूमिका स्वीकारली. 7व्या मिनिटाला हर्ष सिंगने चेंडूवर सुरेख ताबा मिळवत गोलपोस्टचा अचूक वेध घेतला व संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धातदेखील एसपीजे क्लब संघाच्या खेळाडूंनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली.
14व्या मिनिटाला आदित्य वेणीने गोल करून संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. सामन्याच्या अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत एसपीजे क्लब संघाने लौकिक फुटबॉल अकादमी संघावर 2-0 असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सौमित्र कुलकर्णी 10मि., अर्जन सिंग 18मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर फाल्कन्स संघाने यूकेएम एफसी संघाचा 2-0 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.