पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात तीन वर्षात अडीच हजार रुग्ण श्वसनाच्या आजाराचे आढळल्याची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे. धूळ, प्रदूषण आदीसह विविध कारणांनी 2021-22 या वर्षात 1 हजार 301 रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी पाहता श्वसनाच्या आजाराचा त्रास होऊन शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र शहरात आहे.
धुम्रपान आणि वायुप्रदूषणातील विषारी द्रव्यामुळे फुफ्फुसाला बाधा होत आहे. त्यामुळे रक्तातील वायूयुक्त ऑक्सिजन योग्य प्रकारे विरघळू शकत नाही. परिणामी, रुग्णांना अस्वस्थता आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. परागकण, धूळ किंवा प्राण्यांचे केस यामुळे काही लोकांना ऍलर्जी होऊन त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. व्हायरल इन्फेक्शनमुळे देखील श्वसन विकारांना कारण ठरत आहे. यामुळे गेल्या तीन वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. 2019 – 20 या वर्षात 917 रुग्ण आढळले आहेत. पुढील वर्षात 2020-21 मध्ये ही संख्या 546 ने कमी होत 361 वर आली. मात्र 2021-22 मध्ये तब्बल 940 ने ही संख्या वाढून या वर्षी 1 हजार 361 रुग्ण आढळल्याचे महापालिकेकडे नमूद आहे.
या आजारांची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी महापालिका प्रशासन उपाययोजना करत असल्याचे सांगत आहे. मात्र वाढत्या रुग्ण संख्येनुसार महापालिका प्रशासनाला यामध्ये अपयश येत असल्याचे चित्र आहे.
ही घ्या काळजी –
1) धुम्रपान बंद करणे.
2) प्रदुषित वातावरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फेस मास्क वापरणे.
3) थंड पदार्थांचा त्रास होत असल्यास ते टाळणे.
4) ज्या गोष्टींमुळे ऍलर्जीचा त्रास होतोय, त्या पासून दुर राहणे.
5) 30 मिनिटे व्यायाम करणे.
6) डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे.
श्वसन संस्थेचे आजार तीन वर्षातील आकडेवारी –
1) 2019-20 – 917
2) 2020-21 – 361
3) 2021-22 – 1 हजार 301
साथीच्या आजारांमध्ये डेंग्युचे रुग्ण अधिक –
पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कागदोपत्री आकडेवारी कमी दाखवित असले तरी प्रत्यक्ष शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट होते. महापालिकेच्या वतीने तीन वर्षात नोंद केलेल्या आकडेवारीमध्ये मलेरियापेक्षा डेंग्युचे रुग्ण अधिक आढळल्याचे नमूद केले आहे. मलेरियाचे तीन वर्षात 25 तर डेंग्युचे 625 रुग्ण आढळल्याची नोंद आहे. तर पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये कावीळचे 43 तर टॉईफॉइडचे 161 रुग्ण तीन वर्षात आढळल्याचे नोंद आहे.