पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ओळख एक मोठे व्यावसायिक केंद्र अशी देखील आहे. आसपासच्या ग्रामीण परिसरातून येथे मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. काही विशिष्ट भागांमध्ये वस्तू स्वस्त मिळत असल्याने होलसेल आणि रिटेल खरेदीसाठी या परिसरांमध्ये कायमच गर्दी असते. परंतु येथील अनेक व्यावसायिक बनावट वस्तुंची विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये याबाबत गुन्हे देखील दाखल झाले आहेत.
नकली वस्तुंबाबत अलिकडेच राष्ट्रीय पातळीवरील एक अहवाल प्रकाशित झाला. हा अतिशय धक्कादायक अहवाल असून या अहवालानुसार देशात ऑनलाइन अथवा ऑफलाइन विकल्या जाणाऱ्या एकूण वस्तुंपैकी 25 ते 30 टक्के वस्तू या नकली आहेत. बनावट वस्तू बनविण्याचे प्रमाण कपडे आणि एफएमसीजी (फास्ट मूव्हींग कन्ज्युमर गुडूस) या क्षेत्रात अधिक आहे. या व्यतिरिक्त वाहनांचे सुटे भाग, सौंदर्य प्रसाधनांमध्येही हा गोरखधंदा जोरात चालतो. या अहवालानुसार 31 टक्के कपडे कुठल्या तरी ब्रॅंडचे स्टिकर लावून विकले जातात.
गेल्या वर्षी पिंपरीमध्ये सात व्यावसायिकांवर नकली माल विकण्याबाबत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. साध्या कपड्यांवर बड्या ब्रॅंडचे लोगो वापरुन विक्री केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचे धागे पंजाब पर्यंत पोहचले होते.
फर्स्ट कॉपीला मोठी मागणी
नकली वस्तुंना फर्स्ट कॉपी हे एक गोंडस नाव देण्यात आले आहे. यात बड्या ब्रॅंडचे कपडे, घड्याळ, शूज, पेन, गॉगल्स अशा अनेक वस्तू येतात. ब्रॅंड हे सध्या स्टेट्स सिम्बॉल झाले आहे. परंतु प्रत्येकाला ब्रॅंडेड वस्तू परवडत नाही. परंतु आपण ब्रॅंडेड वस्तू वापरतो हे दाखविण्यासाठी फर्स्ट कॉपी नावाने नकली वस्तू घेऊन असलीप्रमाणे मिरविण्यात तरुणाईला आनंद वाटतो. शहरात अनेक दुकाने फर्स्ट कॉपीसाठी ओळखली जातात. तरुण स्वतः दुकानदाराला आपल्याला हव्या असलेल्या कपडे, शूज, घड्याळाच्या ब्रॅंड आणि मॉडल नंबरबद्दल सांगून फर्स्ट कॉपी मागविण्याचा आग्रह करतात.
कधी सांगून तर कधी नकळत होते विक्री
वाहनांच्या नकली सुट्या पार्टसची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. कंपनी प्रॉडक्ट आणि लोकल प्रॉडक्ट अशी असली आणि नकलीची ओळख केली जाते. अनेकदा व्यावसायिक ग्राहकाला विचारतात कंपनीचा देऊ की लोकल? या दोन्ही पार्टसच्या दरांमध्ये मोठे अंतर असल्याने साहजिकच ग्राहक लोकल अर्थात बनावट वस्तुंनाच प्राधान्य देतात. तर काही वस्तुंची इतक्या बेमालूमपणे नक्कल केली जाते की असली आणि नकली यातील फरक ओळखणे अवघड होते. अशा वस्तुंमध्ये नकली वस्तू असली सांगून विकल्या जातात. अहवालानुसार सुमारे 27 टक्के लोकांना हे माहीतच नसते की ते नकली वस्तू विकत घेत आहेत. तर काही ब्रॅंडेडे वस्तू विशेषतः कपडे, शूज, अत्तर, घड्याळ, फॅशन ऍक्सेसरीज यांची असली किंमत ग्राहकाला माहीत असते. त्यामुळे आपल्याला खूपच कमी किंमतीत नकली वस्तू विकली जात आहे, तरी ते घेतात.