पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी, पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी वगळता अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तरच्या प्रवेशास अनिवार्य असलेल्या सर्व सीईटीसाठी अर्ज करण्यास ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सीईटी सेलकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हे अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. मात्र, अनेक अर्ज अर्धवट असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
तीन वर्षीय विधी (लाॅ) अभ्यासक्रम, एमबीए, एमसीसी, आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नालाॅजी, बॅचरल ऑफ डिझाइन तसेच बीएड, एमएड, बीएड-एमएड, बीपीएड,,एमपीएड या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीपर्यंत होती. परंतु सीईटीसाठी अर्ज करण्यास आणखी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यानंतर आता ६ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली. सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या अनाथ व तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काप्रमाणे राहणार आहे.
अर्ज अपूर्ण ठेवू नका
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परंतु या परीक्षांसाठी उमेदवारांची नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षेसाठी नोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्य सीईटी सेलने नमूद केले आहे. त्यामुळे काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या व अर्ज अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज वेळेत भरा
अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी प्रवेशाच्या एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ मार्चपर्यंत, पाचवर्षीय विधी अभ्यासक्रम सीईटीसाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. तसेच बीए अथवा बीएसस्सी-बीएड सीईटीसाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावे, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.
फाइन आर्टसाठी स्वतंत्र वेळापत्रक
बॅचरल ऑफ फाइन आर्ट एज्युकेशन अर्थात दृष्यकला पदवी प्रथम वर्ष या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचे स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदत १ फेब्रुवारीपर्यंत आहे.