नवी दिल्ली – कोविड-19 विषयी दक्षता, प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी गृह मंत्रालयाने दि. 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे, देशात कोविड-19 च्या सक्रिय रूग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे, तरीही जागतिक स्तरावर वाढत असलेली रूग्णसंख्या आणि ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन प्रकारचा विषाणू, या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजणे कायम सुरू ठेवून दक्षता घेण्याची तसेच संक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
प्रतिबंधात्मक विभाग निश्चित करणे, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, कोविडयोग्य वर्तनाला प्रोत्साहन देणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मानक कार्यप्रणालीचे पालन करून ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे, फक्त त्याच गोष्टी यापुढेही करता येणार आहेत.
दिनांक 25 नोव्हेंबर रोजी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याच सूचनांची अंमलबजावणी यापुढेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कठोरतेने करणे आवश्यक आहे, असे या आदेशात म्हटले आहे.