पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत ऋतुजा देशमुख हिच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लिजेंडस पॅंथर्स संघाने सिम्हा वॉरियर्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मुंढवा येथील लिजेंड स्पोर्टस क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून लिजेंड्स संघाने क्षेत्ररक्षण स्विकारले. सिम्हा वॉरीयर्स संघाने सावध सुरुवात केली. माया सोनावणे (19 धावा) आणि तेजश्री ज्ञानेश्वर (18 धावा) या दोघींनी संघाला 36 धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार सायली लोणकर (25 धावा) आणि चरमय गवई (24 धावा) यांनीही 40 धावांची भागीदारी केली. पण मोठी खेळी करण्यात सिम्हा संघाचे फलंदाज अपयशी ठरले व संघाला 20 षटकात 6 गडी गमावून 103 धावाच करता आल्या.
लिजेंडस पॅंथर्स संघानेही कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता सुरुवातीपासूनच धावफलक हलता ठेवला. भूमिका उम्बरजे (नाबाद 35 धावा) व यष्टीरक्षक फलंदाज श्रावणी देसाई (14 धावा) यांनी 52 चेंडूत 36 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या ऋतुजा देशमुख (27 धावा) हिला साथीला घेत भूमिकाने धावा जमवत सामन्यावर आपली घट्ट पकड निर्माण केली. या दोघींनी दुसऱ्या गड्यासाठी 43 चेंडूत 46 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला.
कर्णधार किरण नवगिरे (नाबाद 16 धावा) आणि भूमिका यांनी नाबाद खेळी करून संघाला 17.2 षटकात विजय मिळवून देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावून दिले. ऋतुजा देशमुख अंतिम सामन्याची मानकरी ठरली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे संचालक व पुनित बालन ग्रुपचे सर्वेसर्वा पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या लिजेंडस पॅंथर्स संघाला आणि उपविजेत्या सिम्हा वॉरियर्स संघाला करंडक, पदक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकेचा मानकरी हा किताब पूनम खेमनार (एचपी सुपरनोव्हाज, 212 धावा व 7 बळी), सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब मुक्ता मगरे (ऑक्सिरिच स्मॅशर्स, 178 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा मान उत्कर्षा कदम (सिम्हा वॉरियर्स, 9 बळी), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा मान श्रावणी देसाई (लिजेंडस पॅंथर्स) हिला देण्यात आला. तसेच स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचा मान सिम्हा वॉरियर्सच्या दुर्वा मांडे हिला देण्यात आला. स्पर्धेचे संयोजक सनी मारवाडी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच उपस्थितांचे आभार मानले.
संक्षिप्त धावफलक – सिम्हा वॉरियर्स – 20 षटकात 6 बाद 103 धावा. (सायली लोणकर 25, चरमय गवई 24, माया सोनावणे 19, तेजश्री ज्ञानेश्वर 18, ऋतुजा देशमुख 1-13, भूमिका उम्बरजे 1-16) पराभूत वि. लिजेंडस पॅंथर्स – 17.2 षटकात 2 बाद 104 धावा. (भूमिका उम्बरजे नाबाद 35, ऋतुजा देशमुख 27, किरण नवगिरे नाबाद 16, श्रावणी देसाई 14, दुर्वा मांडे 1-13). सामन्याची मानकरी – ऋतुजा देशमुख.