वॉशिंग्टन : पाण्याखालील दबाव मानवी शरीर किती प्रमाणात सहन करते आणि त्याचे कोणते फायदे तोटे मानवी शरीरावर होतात हे पाहण्यासाठी साउथ फ्लोरिडा विद्यापीठातील एका संशोधकाने तब्बल 100 दिवस पाण्याखाली राहण्याचा प्रयोग सुरू केला आहे.
डॉक्टर जोसेफ डिटोरी असे या प्रोफेसरचे नाव असून समुद्राच्या पाण्याखाली राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केल्याने ते सध्या प्रोफेसर डीप सी या नावाने ओळखले जातात. जोसेफ डिटोरी 55 वर्षाचे असून १०० दिवस समुद्राच्या पाण्याखाली राहून याबाबतचा जुना विक्रम मोडीत काढण्याचा त्यांचा मानस आहे.
यापूर्वी 2014 मध्ये दोन युवकांनी पाण्याखाली तब्बल 73 दिवस व्यतीत करून विक्रम नोंदवला होता जोसेफ डिटोरी यांनी समुद्राच्या पाण्याखाली राहण्यासाठी एक 100 स्क्वेअर फुटचे खास बांधकाम तयार करून घेतले असून ते समुद्राच्या पाण्याखाली 30 फूट खोल अंतरावर तरंगत राहते पाण्याखाली असताना आपल्यावर पृथ्वीवरील दबावापेक्षा 1.6 पट दबाव जास्त जाणवतो असे त्यांनी म्हटले आहे. प्रोफेसर जोसेफ जरी पाण्याखाली राहत असले तरी त्यांच्या आरोग्यवर पाण्याबाहेर राहून काही वैद्यकीय संशोधक लक्ष ठेवत आहेत.
जोसेफ यांचा रक्तदाब आणि इतर सर्व शारीरिक यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वी झालेल्या संशोधनातील निष्कर्षाप्रमाणे पाण्याखालील दबाव सहन करण्याची शक्ती जर मानवात आली तर मानवी आयुष्यमान वाढू शकते.
100 दिवसांनी जेव्हा प्रोफेसर जोसेफ पाण्याबाहेर बाहेर येतील तेव्हा त्यांचे आरोग्य जास्त चांगले असेल आणि सुपर ह्यूमन म्हणून त्यांची गणना होऊ शकेल असे काही संशोधकांना वाटते. प्रोसेस डिटोरी सध्या प्राध्यापक म्हणून काम करत असले तरी या विद्यापीठात कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकन नौदलामध्ये डायव्हिंग ऑफिसर म्हणून कारकीर्द घडवली होती त्यामुळे समुद्राखाली राहण्याचा त्यांचा चांगला अभ्यासही आहे.