छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दोन गटात वाद झाला होता. या वादानंतर काही वेळातच या परिसरात दोन गटांकडून एकमेकांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावेळी झालेल्या दगडफेकीत 51 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या जमावातील काही लोकांनी पोलिसांच्या वाहनांसह 15 खासगी वाहने देखील जाळली. या घटनेनंतर जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा सुद्धा वापर केला. या राड्याप्रकरणात पोलिसांनी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जिनसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या किराडपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचारानंतर हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरी देखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.