सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेत सत्ताधाऱ्यांकडून गेल्या 4 वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ही भ्रष्टाचाराची कीड एक दिवस बॅंकेचे अस्तित्व संपवून टाकेल. अशा भ्रष्टाचारी, ढोंगी व निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत मतदारांनी हद्दपार करून त्यांची जागा दाखवून सभासद परिवर्तन पॅनेलला साथ द्यावी, असे आवाहन सभासद परिवर्तन पॅनलचे नेते शहाजी जाधव यांनी केले.
खटाव गटातील उमेदवार नवनाथ जाधव,निशा मुळीक यांच्या मोळ (ता. खटाव) येथील प्रचार सांगता सभेत श्री. जाधव बोलत होते. यावेळी शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, सभासद परिवर्तन पॅनेलचे नेते बळवंत पाटील, विश्वंभर रणनवरे, उमेदवार नवनाथ जाधव, निशा मुळीक, गोरख पवार, शिवनाथ लखापते, दीपक गिरी, संग्राम गोसावी, किसन मगर, राजाराम जाधव, जालिंदर विभुते, प्रकाश देशमुख, बाबा माने, रविंद्र येवले, संजय सुतार, धनाजी चव्हाण, विश्वास चौधरी, प्रकाश मदने गोरख जाधव, महादेव शिंदे, बाळकृष्ण गायकवाड
शिवाजी मोरकाने, प्रविण जाधव, चंद्रकांत निकम, गोरख दुबळे, दत्तात्रय घनवट, संतोष रणवरे, संजय माने, वैभव जगताप, संभाजी वलेकर, विशाल देशमुख, प्रकाश देशमुख, अरुण आवळे, शामराव कदम, कृष्णात गिरी, सोमनाथ पाटोळे, विलास घोडके, लवेश चोरमले, माजी संचालिका सुलभा सस्ते, सिमा जाधव, विजयश्री मदने, छाया जाधव, दमयंती अब्दागिरे, योगिता गोरे, कीर्ती निकाळजे, गंगोत्री गोसावी, सुजाता बनकर, जयश्री गोरे, प्रियांका करणे, स्वाती जाधव, अनिता माने, वैशाली जाधव, योगिता गोसावी, छाया पाटील, निलम यादव, शालन साठे आदी उपस्थित होते.
उदय शिंदे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी गेल्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये शिक्षक सभासदांना केवळ झुलविण्याचे काम केले. नवनाथ जाधव यांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना मतदारांची सेवक म्हणून इमाने इतबारे सेवा केली आहे. सत्ता नसतानाही त्यांनी कृतीतून अनेक गोष्टी करुन दाखवल्या आहेत. जनतेच्या हितासाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षा मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला अधिक वेळ खर्च केला आहे. शिक्षक सभासदांच्या हितासाठी या निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करून शिक्षक बॅंकेत पाठवावे,असे आवाहन त्यांनी केले.
विश्वंभर रणनवरे म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या गत निवडणुकीत समितीच्या बालेकिल्ल्याला गालबोट लागले होते. परंतु या निवडणुकीत पराभवाची परतफेड व्याजासह करणार आहे. नवनाथ जाधव यांच्यासारखा धडाडीचा संचालक बॅंकेत मोठ्या मताधिक्क्याने पाठवावा. दीपक गिरी म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेलला शिक्षक मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शिवनाथ लखापते म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीत खटाव मतदारसंघातून नवनाथ जाधव व निशा मुळीक यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार शिक्षक सभासदांनी केला आहे. खटाव मतदारसंघात प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग व प्रचारात घेतलेले आघाडी पाहता केवळ नवनाथ जाधव व निशा मुळीक यांचीच लाट आहे. ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली आहे.
गांजाचे झाड मुळासकट बाजूला करणार – थोरात
प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या आर्थिक उन्नती व सभासद हितासाठी मी पुढाकार घेऊन एक रोपटं लावलं होतं. त्या रोपट्याला खतपाणी घालून वाढवलेले रोपटं गांजाचं निघेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. या गांजाच्या रोपट्याने बॅंक संपविण्याचा विडा उचलला आहे. म्हणून हे वाढवलेले गांजाचं झाड उदय शिंदे, बळवंत पाटील, दीपक भुजबळ व मित्र संघटनेच्या मदतीने मुळासकट बाजूला काढून टाकणार आहे, अशी घणाघाती टीका संभाजीराव थोरात यांनी केली.