गुहागर बीच… एका निर्मळ व प्रसन्न पर्यटन अनुभवासाठी!

गुहागरमध्ये काही सुंदर किल्ले आणि मंदिरे आहेत

अरबी समुद्रकिनाऱ्याचा एकूण ७२० किमीचा पट्टा महाराष्ट्राला लाभला आहे जो निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय समुद्रकिनाऱ्यांचा जणू एक खजिनाच आहे. अशाच समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनारा, जो गुहागर ते असगोली पर्यंत ५-६ किमी सोनेरी वाळूत पसरलेला आहे. सुरुच्या बनांनी नटलेला हा समुद्रकिनारा सहज सापडतो. पूर्वेकडे असणाऱ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर आदळणार्या निळ्याशार लाटा हे मनमोहक दृश्य गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पाहावयास मिळते. समुद्रकिनाऱ्यावर नौकाविहार तसेच बनाना राईड व वॉटर स्कुटर सारखे ऍडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स (जलक्रिडा) उपलब्ध आहेत.

जवळपासची प्रेक्षणीय स्थळे
समुद्रकिनाऱ्याशिवाय गुहागरमध्ये काही सुंदर किल्ले आणि मंदिरे आहेत. गुहागर समुद्रकिनाऱ्यापासून फक्त १२.१ कि.मी. अंतरावर ७ एकर क्षेत्र व्यापणारा अंजनवेल / गोपाळगड हा एक सुंदर, निसर्गरम्य किल्ला आहे जो हिरव्यागार पालवीने नटलेला आहे. इ.स. १६६० पर्यंत आदिल शहाच्या ताब्यात हा किल्ला होता, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला. छत्रपती संभाजी राजांच्या कारकिर्दीत किल्ल्याची डागडुजी करण्यात आली आणि १६९९ मध्ये सिद्दी खैर्यत खानकडे सोपवण्यात आला. शेवटी १७५६ मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या अधिपत्याखाली आला.

मंदिरे, तीर्थक्षेत्रे
गुहागर जिल्ह्यातील शंकराचे व्याडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. श्री व्याडेश्वर माहात्म्य या संस्कृत पोथीनुसार हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले, तर मंदिरातील मूर्ती प्राचीन काळातील आहे. मंदिरातील शिवलिंग काळ्या दगडापासून बनवलेले असून त्यावर पितळेसारख्या धातूपासून एक नाग कोरलेला आहे. मंदिराची एक विशिष्ट व्यवस्था आहे ज्याला “शिवपंचायतन” म्हणून संबोधले जाते, याचा अर्थ असा होतो की मध्यवर्ती मंदिराचे सीमांकन चार बाजूंनी गणेश, दुर्गा, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायण यांच्या महत्त्वपूर्ण मंदिरांसह केले गेले आहे. मंदिराच्या आवारातील दीपस्तंभ मंदिराची शोभा वाढवतात. व्याडेश्वर मंदिर, प्रत्येक पर्यटकाने अवश्य भेट द्यावी असे आहे. तसेच मोदका आगर लेक येथे बोटींग सुविधा उपलब्ध आहे.
गुहागर पासुन जवळ दापोली तालुक्यातील दाभोळे येथे एक चंडिका मंदिर सुद्धा आहे, जे जमिनीच्या १५-२० फूट खाली एका गुहेमध्ये आहे. अद्भुत शांततेच्या साक्षात्कारासाठी चंडिका मंदिरास नक्की भेट द्यावी.

खाद्यसंस्कृती
महाराष्ट्र कोकणी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे, आणि तुम्ही गुहागरमध्ये असाल तर थालीपीठ सोबत दही व मिरचीचे लोणचे, कोंबडी वडे, घावणे इ. अस्सल कोकणी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात आणि जर तुम्हाला मासे आवडत असतील तर तांदळाच्या भाकरी सोबत सुरमई फ्राय, कोळंबी मसाल्यावर ताव मारू शकता. गुहागरमध्ये हापूस आंब्यांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते, तेव्हा गुहागरमध्ये असाल तर हापूस आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घ्या.

परिवहन
गुहागर समुद्रकिनारा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेला आहे आणि मुंबईहून गुहागरला जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे जाता येते. तुम्ही चिपळूणपर्यंत रेल्वेने जाऊ शकतात; आणि तिथून पुढे रिक्षाने तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचू शकता. सह्याद्री पर्वतरांगेचे सौंदर्य न्याहाळत रोड ट्रिप करण्याचा पर्यायही आहे. गुहागर बीच मुंबईपासून ३५० किमी (८ तास) आणि पुण्यापासून २८० किमी (६ तास) अंतरावर आहे.

हवामान
ज्यांना वनस्पती सौंदर्य आणि एकांतात वेळ घालवणे आवडते, त्यांच्यासाठी पावसाळ्यात गुहागरला जाणे म्हणजे पर्वणीच असेल. तर ज्यांना एखाद्या शांत समुद्रकिनारी सुट्टीसाठी जायचे असेल त्यांनी डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान गुहागरला भेट द्यावी. ह्या महिन्यांमध्ये तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत जाते.

राहण्याच्या सुविधा
एमटीडीसी वेळणेश्वर रिसॉर्ट
जेव्हा महाराष्ट्रात याल तेव्हा निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि पाककलांनी समृद्ध असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याला अवश्य भेट द्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.