पिंपरी, (प्रतिनिधी) – गिअर उद्योगातीलच नव्हे तर वाहन आणि अन्य यंत्र उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी अंतरराष्ट्रीय गियर टेक्नॉलॉजी इंडिया हे प्रदर्शन आणि येथे होणारी चर्चासत्रे मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संचालक एस. डी. गराडे यांनी व्यक्त केला.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित इंटरनॅशनल पॉवर ट्रान्समिशन एक्स्पो (IPTEX ) आणि इंटरनॅशनल एक्स्पो ऑन ग्राइंडिंग अँड फिनिशिंग प्रोसेस (GRINDEX) प्रदर्शन आणि गिअर टेक्नॉलॉजी इंडिया (GTI) समिट 2024 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहभागी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात देश-विदेशातील गिअर उद्योगातील ७५ कंपन्यांचा सहभाग आहे. प्रदर्शन येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. हे प्रदर्शन उद्योगासाठी भारतातील एकमेव ट्रेड शो आणि व्यासपीठ आहे. ऑटोमोबाईल, एरोस्पेस, संरक्षण उपकरणे, मरीन, मशीन टूल्स, मटेरियल हाताळणी, सिमेंट उद्योग यासारख्या ५० हून अधिक उद्योगांमधील व्यावसायिक, लघु व मध्यम उद्योजक तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील अभ्यागतांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
तीन दिवसांमध्ये या समिटमध्ये अनेक सादरीकरणे, पॅनेल चर्चा, परिसंवाद आणि फायरसाइड चॅटचा उद्देश केवळ गियर उत्पादकांसाठी असेल आणि गियर उत्पादन उद्योगातील प्रख्यात वक्ते मार्गदर्शन करतील. याशिवाय, भारताचा पहिलाच ‘ गियर मॅन्युफॅक्चरिंग फॉर बिझनेस आणि एक्सलन्स अचिव्हमेंट अवॉर्ड ‘ने भारतीय गीअर उद्योगातील प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या कंपनीचा गौरव केला जाणार आहे.