पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात व्यायाम, फिरायला जाणाऱ्या दरमहा हजार रुपये आकारले जाणार आहे. “एसपीपीयू ऑक्सिजन पार्क’ या योजनेअंतर्गत याबाबतचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध करताच त्यास विद्यार्थी संघटनेने जोरदार विरोध केला आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने “एसपीपीयू ऑक्सिजन पार्क’ प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता दिली होती. मात्र, करोनामुळे योजनेची अंमलबजावणी झाली नव्हती. आता येथे सदस्यत्वाचे तीन टप्पे आहेत. त्यानुसार मासिक शुल्क एक हजार रुपये, सहामाही शुल्क साडेपाच हजार रुपये आणि वार्षिक शुल्क 10 हजार रुपये भरून सदस्यत्व घ्यावे लागेल.
सदस्याला ओळखपत्र दिले जाईल. 9 ते 16 वयोगटातील मुलांना सदस्यत्व शुल्क नसून, नोंदणी आणि ओळखपत्रासाठी 500 रुपये भरावे लागतील. अल्प उत्पन्न गटासाठी 50 टक्के सवलत, दिव्यांग व्यक्तींना विनाशुल्क प्रवेश दिला जाईल.
पहाटे साडेचार ते सकाळी आठ, सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत येथे प्रवेश असेल. सदस्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधांमध्ये सवलत, जयकर ग्रंथालयाच्या सदस्यत्व शुल्कात सवलत आदी सुविधा मिळतील.