लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला

“कॉलर की मिशी’ आज उत्तर मिळणार
सातारा  –
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्‍का कमालीचा वाढल्याने निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. जिल्ह्यात “कॉलर की मिशी’ या प्रश्‍नाचे उत्तर उद्या, दि. 24 रोजी मिळणार असून मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या पैजा लागल्या आहेत.

उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने जोरदार ताकद लावली असली तरी उदयनराजे यांच्या अट्टाहासामुळे ही निवडणूक लादली गेल्याची भावना मतपेटीतून व्यक्‍त झाली असावी, अशी चर्चा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेने उदयनराजे यांना व समर्थकांना दिलासा मिळाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भरपावसात घेतलेल्या सभेने पुन्हा जिल्ह्यातील राजकीय वातावरणाचा नूरच पालटून टाकला. श्रीनिवास पाटील यांची सनदी अधिकारी म्हणून गाजलेली कारकीर्द, दोन वेळची खासदारकी, सिक्‍कीमचे राज्यपाल या जमेच्या बाजू असून त्यांचा सातारा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. त्यातच “वर घड्याळ’ आणि “खाली कमळ’ अशा पद्धतीने क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना मोठी आघाडी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 59 टक्‍के मतदान या मतदारसंघात झाले आहे. येथील एक लाख 85 हजार मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. हा घटलेला टक्‍का उदयनराजे व भाजपसाठी धोक्‍याची घंटा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, दोन्ही पक्ष विजयाचे दावे करत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांनी हॅट्‌ ट्रिक केली तरी पाच महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य एक लाख 28 हजारापर्यंत घटले होते. या पार्श्‍वभूमीवर पोटनिवडणुकीला सामोरे जाताना उदयनराजे यांच्यापुढे मताधिक्‍य राखण्याचे आव्हान आहे. मात्र, लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये “क्रॉस व्होटिंग” झाल्याच्या चर्चेने अस्वस्थता वाढली आहे.

विरोधात कोणीही उमेदवार असला तरी आपण विजयी होणारच, असा आत्मविश्‍वास उदयनराजे व्यक्‍त करत असत. 2009 मध्ये दोन लाख 97 हजार तर 2014 मध्ये मोदी लाटेतही तीन लाख 66 हजार मतांनी ते विजयी झाले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचे मताधिक्‍य कमालीचे घटले. उदयनराजेंना मिळालेली मते वाढली असली तरी विरोधी उमेदवाराला मिळालेल्या लक्षणीय मतांमुळे उदयनराजेंच्या विरोधात असलेली नाराजी स्पष्ट झाली. 2009 आणि 2014 च्या तुलनेत कमालीचे घटलेले मताधिक्‍य उदयनराजे यांच्यासाठी धोक्‍याचा इशारा मानला गेला होता. कराड दक्षिण आणि पाटण या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ते पिछाडीवर गेले होते, त्यावेळी “हा कसला विजय’ असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले होते.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे यांनी पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे भाजपने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा साताऱ्यात घेऊन उदयनराजे यांच्या मागे जोरदार ताकद लावली. त्यामुळे दोन्ही पक्षांतून विजयाचा दावा होत असल्याने काय होणार याची उत्सुकता ताणली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.