एसटी प्रशासनाकडून आरोप करत पोलिसांकडे कारवाईची मागणी
पुणे – रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या केलेल्या रिक्षा, बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहाआसनी रिक्षा, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि रात्रीच्या वेळी चौकाच्या आसपास पार्क करण्यात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समुळे स्वारगेट येथील जेधे चौकात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. यावर कारवाई करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) वाहतूक पोलीस शाखेकडे सातत्याने तक्रारी केल्या असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्थानकाबाहेरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बेशिस्त रिक्षा आणि ट्रॅव्हल्स कोंडीला कारणीभूत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.
स्वारगेट परिसरात टिळक रस्ता, सारसबागेकडे जाणारा रस्ता, व्होल्गा चौक ते मित्रमंडळ चौक, पंचमी हॉटेल परिसर, शंकरशेठ रस्त्यावर काही ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स थांबलेल्या असतात. सायंकाळी सहानंतर या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढते. यासह जेधे चौकातून व्होल्गा चौकाकडे (लक्ष्मीनारायण थिएटर) जाणाऱ्या रस्त्यावर एसटी स्टॅंडपासून पुढे चिंचोळा रस्ता आहे. या ठिकाणी डाव्या बाजूस पीएमपीचा बसस्टॉप असून, तेथे रिक्षांची रांग लागते. त्यामुळे पीएमपी बसला अनेकदा अडथळा होतो. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. रात्री नऊनंतर या खासगी गाड्या अगदी एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीसाठी अरुंद रस्ता राहत असून, एसटी स्थानकातून बाहेर बस स्वारगेट आगारातून बाहेर पडताना मर्यादा येतात.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी स्थानकापासून दोनशे मीटरच्या परिघात खासगी ट्रॅव्हलच्या व्यवसायास, बस उभ्या करण्यास मनाई आहे. मात्र, स्वारगेट येथे थेट एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असून, वाहतूक कोंडीसाठीदेखील ते कारणीभूत ठरत आहे, अशी माहिती एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. दरम्यान, वाहतूक पोलीस काही वेळेला कारवाई करतात. मात्र ट्रॅव्हल्स उभ्या राहण्याचे प्रकार दररोजच सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.