धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या पिकांना भरपाई द्या : नरेंद्र घुले

शेवगाव – जायकवाडी धरणाचे पाणी धरणासाठी संपादित न केलेल्या शेतजमिनीत येऊन पाण्याखाली गेलेल्या नुकसानग्रस्त खरिप पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांप्रमाणे या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, माजी सभापती अरुण लांडे, पंडित भोसले, पंचायत समिती सदस्य कृष्णा पायघन, माजी प्राचार्य के. वाय. नजन, प्रा. संतोष अडकिते, श्‍याम जाधव, उमेश वैद्य, दादा माळवदे, बन्सी पवार, संपत मिसाळ, सचिन माळवदे, रामभाऊ राऊत, संजय पाऊलबुद्धे, श्रीधर कर्डिले, प्रदीप मडके आदींसह धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घुले पाटील म्हणाले, राज्याचे हित लक्षात घेऊन फक्त सातशे रुपये एकरी काळ्याभोर शेतजमिनी शेवगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणासाठी दिल्या.

अजूनही धरणग्रस्तांच्या समस्या संपलेल्या नाहीत. या वर्षी मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसाने जायकवाडी धरणात आलेले पाणी तालुक्‍यातील दहिगावने, घेवरी, चांदगाव, शहरटाकळी, भावीनिमगाव, ढोरसडे, अंत्रे, हिंगणगाव, दहिफळ, दादेगाव, ताजनापूर, एरंडगाव, खानापूर आणि कऱ्हेटाकळी या शिवारातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या असंपादित क्षेत्रात घुसले आहे. हे पाणी या भागातील शेतकऱ्यांच्या बाजरी, ऊस, कपाशी, तूर या पिकांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पाणी पातळी कमी होत नसल्याने व सर्वत्र दलदल झाल्याने या पिकांबरोबर पुढील रब्बी हंगामही वाया जाणार आहे.

सदर शेतजमिनी धरणासाठी संपादित केलेल्या नसल्याने शासनाने गांभीर्याने विचार करून कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या धर्तीवर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी करताना त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी नुकसानग्रस्त शेतजमिनींचे छायाचित्रे दाखवत वस्तुनिष्ठ माहितीही घुले यांनी तहसीलदारांना दिली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)