देहूरोड – देहूरोड (अलकापुरी) येथील केंद्रीय विद्यालयाजवळ खोदकाम सुरू असताना ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळून आला. पोलिसांनी बॉम्ब ताब्यात घेत बॉम्ब शोधक व नाशक पथकाला याबाबतची माहिती दिली. ही घटना बुधवारी (दि. 30) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. बॉम्ब सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करी भागात असणाऱ्या अलकापुरी येथील केंद्रीय विद्यालयाजवळ (क्रमांक 2) खोदकामाचे कामकाज सुरू होते. त्यासाठी “जेसीबी’च्या साह्याने खोदकाम केले जात होते. ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळून आला. जेसीबी चालक व माती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने त्यासंर्दभातील माहिती पोलिसांना दिली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविण्यात आले.
लष्करी तळावर आढळलेला बॉम्ब ब्रिटिशकालीन असून, सुमारे दीड फूट लांबीचे आणि सहा इंच व्यासाचे असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. बॉम्बची माहिती मिळताच देहूरोड विभागीय सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने बॉम्ब ताब्यात घेतला. तसेच याबाबत लष्करी अधिकारी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती दिली असून, योग्य तपासाअंती बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडे बॉम्ब देण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली.
दहा दिवसातील दुसरी घटना
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे एका ग्रुप प्रकल्पाचे खोदकाम सुरू असताना अशाच प्रकारे ब्रिटिश कालीन बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर बुधवारी देहूरोड परिसरात खोदकाम सुरू असताना बॉम्ब आढळून आल्याने परिसर घबराट पसरली आहे.