माजी सैनिक अनिल सातव यांची मागणी : वाघोली ग्रामपंचायतीला निवेदन
वाघोली – वाघोलीत वास्तव्यास असणाऱ्या सैन्य दलातील जवानांना व माजी सैनिकांना वाघोली ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी करातून सूट द्यावी, अशी मागणी माजी सैनिक अनिल सातव यांनी वाघोली ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सैनिकांना करातून सूट दिली असून याबाबत वाघोली ग्रामपंचायत सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सातव यांनी व्यक्त केला आहे.
वाघोलीतील माजी सैनिक व सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी देशाची सेवा केली आहे व करीत आहेत. जीवाचे रान करून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची घरपट्टी व पाणीपट्टी व विविध करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती; मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. बारामती तालुक्यातील करंजेपूल तसेच नुकतेच खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतीने देखील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव संमत केला आहे. यानुसार वाघोली येथील माजी सैनिक अनिल सातव यांनी देखील माजी सैनिकांना घरपट्टीत सूट देण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीकडे पुन्हा मागणी केली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या एका परिपत्रकानुसार आजी-माजी सैनिकांना घरपट्टीत सुट देण्याबाबत सूचित करण्यात आल्याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये आले होते. महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी माजी सैनिकांना करात सूट दिली असल्याने वाघोली ग्रामपंचायतीने देखील याबाबत विचार करावा.
-अनिल सातव, माजी सैनिक