मुंबई – भारतीय संघाच्या आगामी मालिकांमध्ये संघातील सर्व खेळाडूंना रोटेशन पद्धतीने संधी मिळेल. संघातील नवोदितांमध्ये गुणवत्ता आहे त्यामुळे त्यांना संधी निश्चितच मिळेल, अशी ग्वाही भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक व माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी दिली आहे.
द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यावर लगेचच येत्या बुधवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून ते कार्यरत होणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी मालिका ही भारताची पहिली मालिका असेल. या मालिकेत तिन टी-20 व 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविड यांनी सर्व खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधला आणि आगामी मालिकेत प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले.
द्रविडने प्रत्येक खेळाडूला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल विचारले. इतकेच नाही तर द्रविडने तंदुरुस्त वाटत नसल्यास आणि आवश्यक असल्यास विश्रांती घेण्याचेही सांगितले. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाणार असल्याचे त्याने सांगितले. तसेच भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून त्याला काय अपेक्षा आहेत याबद्दलही द्रविडने संवाद साधला.