चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरी वाढली होती. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. अखेर चंद्रपूर पोलिसांना वाहनचोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं आहे.
वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रमुख एका युवतीला अटक करण्यात आली आहे. तिच्या दोन्ही साथीदारांसह तिची रवानगी पोलिस कोठडीत कऱण्यात आली आहे.
आरोपीचं नाव वैष्णवी देवतळे असून ती युवती प्रमुख आहे. आपल्या दोन साथीदारांसह खास पद्धतीने हे तिघे गाडी लांबवत होते. ही टोळी प्रामुख्याने मोपेड गाड्यांनाच लक्ष्य करत होती. आरोपी वैष्णवीसह अटक करण्यात आलेल्यांची नावं मनीष पाल आणि सौरभ चंदनखेडे अशी आहे.
आरोपी गर्दीच्या ठिकाणी हँडल लॉक नसलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवत होते. त्यानंतर ती गाडी ढकलत निर्जनस्थळी नेत असतं. त्यानंतर यांच्यापैकी एक मॅकेनिक गाडी सुरू करत असे. अशा पद्धतीने वाहनचोरी करून चोरीच्या वाहनांची इतरत्र विक्री करण्यात येत होती. या टोळीने चोरलेल्या ११ मोपेड गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.