सर्वांना अशा लक्ष्मीची गरज

मुंबई – चित्रपट रसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. दरम्यान, नुकतंच अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित केला असून, सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा एक भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण असा चित्रपट असणार आहे.

अक्षय कुमार पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. अक्षय कुमार भूमिका साकरणार असल्यामुळे ट्रान्सजेंडर समुदायामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

याबाबत लक्ष्मी शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून ट्रेलरला धमाकेदार म्हटले आहे. या व्हिडीओत लक्ष्मी म्हणतेय की, लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे. माझेही नाव लक्ष्मी असल्याचा आनंद होत आहे. या ट्रेलरची भरपूर उत्सुकता होती. लिव लाइफ क्वीन साइज. आम्ही तर एखाद्या महाराणीसारखं जगतो. सध्या सर्वांना अशा लक्ष्मीची गरज आहे. ट्रेलर पाहून माइंड रिफ्रेश झालं. ट्रन्सजेंडरच्या संवेदना आणि अडचणींना मोठ्या पडद्यावर घेऊन आल्याबद्दल अक्षय आणि टीमचं मनापासून आभार व्यक्त करते.

दरम्यान, ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथेचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की, ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, ”ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल, त्या दिवशी मी बांगड्या घालेन.” त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाज पाहायला मिळतो.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 22 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.