नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकांत विविध प्रकारची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला करोनावरील लस दिली जाणार आहे. त्या लसीकरणाची प्रक्रिया मतदानाच्या आधी होईल.
निवडणूक प्रक्रियेवेळी करोना संकटाशी निगडीत सुरक्षितताविषयक नियमांचे पालन केले जाणार आहे.
त्यातूनच मतदानासाठी अतिरिक्त एक तासाचा अवधी मिळणार आहे. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. घरोघरी प्रचाराची परवानगी उमेदवारासह पाच व्यक्तींनाच असेल. रोड शोमध्ये जास्तीतजास्त पाच वाहनांचाच वापर करता येईल. पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मिळून विधानसभांच्या 824 जागा आहेत. त्या जागांसाठी सुमारे 2 लाख 70 हजार केंद्रांवर मतदान होईल. निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून जवळपास 18 कोटी 68 लाख मतदार आहेत.