आसाममध्ये कॉंग्रेस पुन्हा सत्ता हस्तगत करणार ?

नवी दिल्ली – आसाममधील विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. राज्यात 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी ही निवडणूक होईल. तर 2 मे रोजी निकाल घोषित होईल. सध्या राज्यात भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी या पक्षाने सगळी शक्ती पणाला लावली आहे.

2016 मध्ये झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजप 60 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आसाममध्ये बहुमतासाठी 64 आमदारांची गरज होती. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने एकूण 86 जागा जिंकल्या. एका अपक्ष आमदारानेही एनडीएच्या सरकारला पाठिंबा दिला. या निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव होत सत्तेतील कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या 78 वरुन थेट 26 वर आली तर भाजपने 26 वरुन 86 वर मजल मारली.

आसाममध्ये 2016 च्या निडणुकीत एकूण 4 गटांमध्ये निवडणूक झाली होती. यात भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झाली. यात आसाम गण परिषद, बोडोलॅंड पिपल्स फ्रंट, रभा जातीय ऐक्‍य मंच आणि तिवा जातीय ऐक्‍य मंचाचा समावेश होता. संयुक्त पुरोगामी आघाडीत कॉंग्रेस आणि युनायटेड पिपल्स पार्टी (लिबरल) यांचा समावेश होता. डाव्या पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षांनी देखील युती केली होती. याशिवाय आणखी एक ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या नेतृत्वातही एक आघाडी निवडणूक मैदानात होती.

विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीतही या राज्यात भाजपने जोरदार कामगिरी केली आहे. मात्र नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून मध्यंतरी पक्षाच्या विरोधात वातावरण गेले होते. त्यावर पक्ष कशी मात करतो यावरून त्यांना दुसरी संधी मिळणार की नाही, हे निश्‍चित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.