डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती : समाजोपयोगी उपक्रम, भीमगीतांची रेलचेल
पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती मंगळवारी साजरी होत आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी रस्त्यावर येऊन कार्यक्रमांचे आयोजन न करता सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर करत आहेत. यामध्ये विविध संस्था, संघटनांबरोबरच अनेक अनुयायी सोशल डिस्टन्सिंग पाळत, घरी साजरी केल्या जाणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीचे फोटो व व्हिडिओ अपलोड करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यावर यंदा करोनामुळे मर्यादा आल्या आहेत. मात्र, ही संधी मानत भीमसैनिकांनी त्याचा मोठा फायदा करून घेतला आहे. संचारबंदीचा भंग न होता, दोन-तीन सहकाऱ्यांसोबत गायन, वादनाचे कार्यक्रम उत्साहात सुुरू आहेत. औरंगाबादच्या गायिका कडूबाई खरात या त्यांच्या विशिष्ट गायनशैलीमुळे गेल्यावर्षी एकदम प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांच्या विविध वाहिन्यांवरील गायनाच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र, यंदा करोनामुळे डॉ. आंबेडकर जयंतीला (दि.14) सकाळी दहा ते बारा या वेळेत त्या भीमगीतांच्या माध्यमातून फेसबुक लाइव्हद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेलेल्या अनेक कला पथकांनी घरातूनच आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवली आहेत. कामगार, झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य असलेल्या नागरिकांना शिधावाटप, अन्नदान यासारखे उपक्रम राबविण्यावर अनेक संस्था, तरुण मंडळे व महिला बचतगटांनी भर दिला आहे.
समता सैनिक दलाच्या जवानांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमधील नागरिकांना शिधा वाटप व अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. तर अनेक व्याख्यात्यांनी ऑनलाइन येण्याची वेळ व व्याख्यानाचा विषय जाहीर करत, सोशल मीडियावर संवाद साधत आहेत. अनेक पुस्तकप्रेमींना यंदाची भीमजयंती पुस्तके वाचून साजरी करण्याची संधी चालून आली आहे. याशिवाय, मंडळांच्या वतीने गतवर्षी काढल्या गेलेल्या मिरवणुकांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.
ऑनलाइन जयंतीलादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद
करोनामुळे घरात बसूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन शरद पवार, ऍड. प्रकाश आंबेडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत, नागरिक सोशल मीडियावरून एकेमकांना शुभेच्छा देत आहेत. निवडणुकांदरम्यान सोशल मीडियावर सक्रीय राहणाऱ्या अनुयायांचा ऑनलाइन भीम जयंतीलादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.