Ajay Devgan : दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनेकांनी या शोमध्ये मोठे खुलासे केले. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. नुकतेच या शोमध्ये अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली होती. यावर दोघांनी विविध विषयांवर भाष्य केले. अजय देवगणने यावेळी लेक निसाच्या ट्रोलिंगबाबत देखील भाष्य केले.
सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रिटींसह स्टार किड्सला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक कार्यक्रमांमध्ये निसा सहभागी होताना दिसते. तिचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावरून तिला ट्रोलही केले. लेकीला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगबाबत करणने “निसा जिकडे जाईल तिकडे पापाराझी तिच्या मागे असतात, याबाबत तुझं काय मत आहे”, असा अजय ला प्रश्न विचारला. त्यावर मला आणि तिलाही या गोष्टी आवडत नसल्याचे अजय देवगणने सांगितले.
अजय देवगण म्हणाला की, “मला हे आवडत नसले तरीही तुम्ही हे बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर प्रेम करता. काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात याचा अर्थ सगळेच तुमच्याबद्दल तोच विचार करतात असं नाही. त्यामुळे या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. तुम्ही चांगल्या गोष्टींबद्दल पोस्ट करता पण कोणीही ते वाचत नाही. सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत नसूनही ते स्वत:ला स्टार समजतात.”
यावेळी निसाच्या इंडस्ट्रीत येण्याच्या प्लॅनबद्दलही करणने अजय विचारले. त्यावर “मला वाटत नाही की तिला ते हवे आहे. पण उद्या काही बदललं तर ते 20 वर्ष जुनी मुलाखत चालवतील”, असं अजय देवगण म्हणाला. अजयशिवाय काजोलनेही निसाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत काजोल म्हणाली होती की, “मला वाटते की ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा एक विचित्र भाग बनला आहे. तो 75 टक्के झाला आहे. जर तुम्हाला ट्रोल केले गेले तर तुमची दखल घेतली जाते. जर तुम्ही ट्रोल झालात तर तुम्ही प्रसिद्ध आहात. ट्रोल झाल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होत नाही असे वाटते.”