नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुढील महिन्यात दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीत पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नववर्षात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशातून भाजपच्या आगामी बैठकीला महत्व असेल. अर्थात, आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या उद्देशातून संघटनात्मक निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय त्या बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरू शकते. त्या निर्णयामुळे नड्डा यांना अध्यक्ष म्हणून आपोआपच मुदतवाढ मिळेल.
नड्डा यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पुढील महिन्यात समाप्त होणार आहे. त्यांच्या आधी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. शहांनी पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण केले. ते नड्डा यांनी टिकवल्याचे मानले जाते. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध आहेत.
त्याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कार्यकाळ वाढल्यानंतर एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी नड्डा हेच भाजपचे अध्यक्ष असतील.