आवक घटल्यानंतरही भाजीपाल्याचे दर स्थिर

आल्याची पुन्हा दरवाढ: टोमॅटो,फ्लॉवर, कोबी, वांगी स्वस्त

कांद्याचे दर तीन रुपयांवर

दिवसेंदिवस कांद्याचे उन्हाळ्यात काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता असतानाही कांद्याचे दर पुन्हा एकदा कमी झाले आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याचा दर निम्यावरवर येवून ठेपला असून सध्या मोशी बाजार समितीमध्ये कांदा तीन रुपये किलो दराने विकला जात आहे. वारंवार होणाऱ्या दरातील पडझडीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली. कांद्याच्या उत्पन्नाचा खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही निघेना झाल्याची प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

पिंपरी – ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळामुळे आता शहरी भागात मागील काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे, फळभाज्या आणि भाजीपाल्यांचे दर ऐन उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत असले तरी या आठवड्यात मात्र ही वाढ दिसून आली नाही. या आठवड्यातही पिंपरी आणि मोशी येथील उपबाजारसमितीमध्ये भाजीपाल्याची आवक मागच्या आठवड्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटली. मात्र, सर्वसामान्यांच्या गरजेच्या भाज्यांची आवक मुबलक प्रमाणात झाल्याने आवक घटुनही भाज्यांचे दर स्थिर राहील्याचे दिसत आहे.

मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातदेखील मोशी बाजार समिती आणि पिंपरी येथील भाजीमंडईमध्ये फळभाज्यांची आणि पालेभाज्यांची आवक सरासरीच्या तुलनेत कमी राहिली. त्यामुळे, भाजीपाल्यांच्या दरामध्ये सुरू असलेली दरवाढ कमी झालेली नसली तरी या आठवड्यात भाज्यांच्या दरामध्ये सातत्याने होणारी वाढ मात्र काही प्रमाणात रोखली गेली आहे. या आठवड्यात मोशी येथील बाजार समितीमध्ये फळभाज्यांची आवक केवळ 860 क्विंटल झाली. तर पालेभाज्यांच्या 17 हजार गड्ड्या व फळांची आवक 376 क्विंटल झाली आहे. या आठवड्यात झालेली आवक ही सरसरी पेक्षा अत्यंत
कमी आहे.

या आठवड्यात लसणाच्या दरामध्ये 100 रुपयांची घसरण झाली असून लसूण प्रतिक्विंटल 1 हजार 900 हजार रुपयावर जाऊन पोहोचला आहे. तर आल्याचे दर या आठवड्यातही 500 रुपयांची वाढ होऊन प्रतिक्विंटल 5 हजार 750 रुपयांवर पोहचले आहेत. भेंडीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे. भेंडीला प्रतिक्विंटल 3 हजार 250 रुपये दर मिळाला. गवारीच्या दरामध्ये या आठवड्यातही 250 रुपयांनी वाढ झाली आहे. गवार सरासरी 5 हजार रुपये प्रतिक्विंटलने मिळत आहे. गवारीबरोबरच मटारीचे दरही 250 रुपयांनी वाढले तर मागच्या आठवड्यात वाढलेल्या घेवड्याचे दर या आठवड्यात स्थिर राहिले आहेत. टोमॅटोच्या दरामध्ये प्रतिक्विंटल 350 रुपयाची घसरण होऊन टोमॅटोचा भाव 650 रुपये क्विंटल झाला आहे. फ्लॉवरच्या दरामध्ये प्रतिक्विंटल 100 रुपये घसरण झाली तर कोबीचे दरही प्रतिक्विंटल 600 व वांग्याच्या दरामध्ये प्रतिक्विंटल 500 रुपयाची घसरण झालेली पहायला मिळाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.