मारहाण, तोडफोड ः सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीतीचे वातावरण
पिंपरी – सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील लहान-मोठ्या टोळक्यांवर पोलिसांना नियंत्रण मिळवता न आल्याने परिसरातील नागरिकांना भितीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. रविवारी दुपारी पुन्हा एकदा पिंपळे गुरव परिसरात टोळक्याने एका घरात घुसून दहशत माजवली. खिडक्यांच्या कांचाची, वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी मनोज शंकर कचरे (वय-38, रा.पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून कीव्हन जॉर्ज एँथोनी (वय 25), विक्रांत गौतम जाधव (वय 25), अनुप उल्हास चव्हाण (वय-25), एँथोनी जॉर्ज फर्नांडिस (वय-22, रा.खराळवाडी) यांना अटक करण्यात आली असून इतर तीन ते चार साथीदार हे फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपळे-गुरव येथील लक्ष्मीनगर परिसरात टोळके फियादी कचरे यांच्या घरी आले. फिर्यादी यांचा पुतण्या सोनू कोठे आहे, अशी विचारणा करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. यावेळी टोळक्याने खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराबाहेर पार्क केलेल्या मोटार व दुचाक्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना अटक केली तर त्यांचे इतर साथीदार पसार झाले आहेत.
उल्लेखनीय बाब अशी की, सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील ही तीसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रहाटणी परिसरात अलिकडेच दिवसांपूर्वीच टोळक्याने कोयत्याने खिडकीच्या काचा फोडून, दुचाकीची तोडफोड करत दहशत पसरवली होती. अर्थात ही दोन गटांच्या आपापसातील भांडणातून हा प्रकार घडला होती. दोन्ही टोळ्यांनी विरोधी टोळीच्या गल्लीत जाऊन दहशत माजवली होती.