कोविड पश्‍चातही 20 दशलक्ष मुली शाळेपासून वंचित – मलाला

इस्लामाबाद – कोविड-19 चे संकट संपल्यानंतरही तब्बल 20 दशलक्ष मुलींना शाळेत जाता येणार नाही, असे प्रतिपादन शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेली सर्वात युवा कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिने व्यक्‍त केले आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या आमसभेमध्ये बोलताना तिनेहे मत व्यक्‍त केले आहे. 

कोविड-19 हा जगभरातील शिक्षणसंस्थांना आणि शैक्षणिक उद्दिष्टांना बसलेला मोठा हादरा आहे. शैक्षणिक प्रक्रियेत निधी अभावी मोठी तफावत निर्माण झाली आहे. वर्षाला 200 अब्ज डॉलरचा निधी शिक्षणासाठी कमी उपलब्ध होणार आहे. 

त्यामुळे ही तफावत भरून काढणे लगेच शक्‍य होणार नाही. कोविडची आपत्ती संपल्यानंतरही तब्बल 20 दशलक्ष मुलींना शाळेत जाता येणार नाही, असे मलालाने म्हटले आहे. 

स्थावर जागतिक उद्दिष्टांसाठी संयुक्‍त राष्ट्राने पाच वर्षांपूर्वी निश्‍चित केलेल्या कार्यक्रमांवर आंतरराष्ट्रीय समूदायाने काम करावे. ज्यांना शिक्षण हवे आहे आणि समानतेचा हक्क हवा आहे, अशा लक्षावधी मुलींच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही मलालाने व्यक्‍त केली आहे.

गेल्या पाच वर्षात मुलींच्या शिक्षणाच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने फार विशेष प्रयत्न झालेले नाहीत. त्यासाठी नियोजनाचे काम आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कधी केले जाणार आहे, असा सवालही मलालाने उपस्थित केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.