बेल्जीयम – नद्यांना आलेल्या पुराने पश्चिम युरोपला अक्षरश: धुवून काढले. जर्मनी, बेल्जीयम आणि शेजारच्या काही देशांत मुसळधार पावसाने आठवडाभर थैमान घातले. त्यात मरण पावलेल्यांची संख्या 150 पेक्षा अधिक आहे. शेकडो जण अद्याप बेपत्ता आणि बेघर झाले आहेत. काही महत्त्वाच्या भागातील संपर्क यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत.
जर्मन राज्य नॉर्थ ऱ्हिने वेस्टफालिया आणि ऱ्हिनेलॅंड-पॅलेटीनेट त्याचबरोबर बेल्जीयम आणि नेदरलॅंडच्या काही भागात हा पूर आला होता. एका दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने एकट्या जर्मनीत 103 जणांचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्तीत गेल्या 60 वर्षात बळींची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यात एका अपंग लोकांच्या निवारागृहातील 12 जणांचा समावेश आहे.
काही भागात रस्ते आणि घरे पुराच्या पाण्याने भरून गेली आहेत. पाणी ओसरल्यानंतर अनेक मोटारी उलटल्या असल्याचे दिसून आले. काही जिल्ह्यांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे.
बेल्जीयममध्ये मंगळवारी एका दिवसांत 20 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण बेपत्ता असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. एका विभागात 21 हजार लोकांना विजेशिवाय रहावे लागले.
शेजारच्या नेदरलॅंडमधील लिंबर्ग परगण्यात शुक्रवारी पाणी घुसल्याने हजारो लोकांना हलवण्यात आले. आपत्कालीन सेवा सतर्कतेवर ठेवण्यात आल्या असून पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्कालीन यंत्रणांपुढील आव्हान वाढले आहे.
मास्ट्रीच शहरातील पाण्याची पातळी ओसरत असून तेथे फारशी हानी झाली नाही. वेल्कनबर्गमध्ये मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र तेथे जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.