युरो कप फुटबॉल | सहा दशकांत प्रथमच 11 शहरांत आयोजन

लंडन – युरोपियन फुटबॉल स्पर्धेचे (युरो कप) वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून यंदा सहा दशकांत प्रथमच ही स्पर्धा जगातील वेगवेगळ्या 11 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. जगभरात अद्याप कायम असलेल्या करोनाच्या धोक्‍यामुळे गेल्या वर्षी स्थगित केलेली ही स्पर्धा यंदा होणार की नाही याबद्दल निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.

येत्या शुक्रवारपासून ही स्पर्धा सुरू होत असून स्पर्धेच्या 60 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 11 वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने होणार आहेत. 1960 साली या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. गेल्या वर्षी या स्पर्धेला 60 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जंगी सोहळा आयोजित होणार होता. मात्र, करोनामुळे या सगळ्या गोष्टी रद्द कराव्या लागल्या होत्या.

गतविजेता पोर्तुगाल आणि फिफा विश्‍वकरंडक विजेता फ्रान्ससह सर्व संघांना 6 गटात विभागण्यात आले आहे. या वेळी लंडन, ग्लासगो, कोपेनहेगन, सेव्हिल, बुडापेस्ट, ऍम्स्टरडॅम, रोम, म्युनिक, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे या स्पर्धेचे सामने होतील.

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर या स्पर्धेची अंतिम लढत होईल.जवळपास एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 24 संघ 51 सामने खेळतील. 26 जूनपासून बाद फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ गट टप्प्यात तीन सामने खेळेल. 11 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे.

सोनी वाहिनीवरून थेट प्रक्षेपण

सोनी स्पोर्टस नेटवर्क या वाहिनीवर भारतातील फुटबॉल चाहते ही स्पर्धा पाहू शकतील. सोनी टेन 2 आणि सोनी टेन 2 (हिंदी) वर ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाणार असून एचडी वाहिनी आणि वाहिनीच्या ऍपवरही स्पर्धेचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.