आंब्यापेक्षा महाग रानमेवा

  • अत्यल्प प्रमाणात आवक 
  • करवंदे, जांभळाचे दर दोनशे ते तीनशे रुपये किलो

पिंपरी – करवंदे व जांभळे या रानमेव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील खवय्यांना आता कुठे त्याची चव चाखायला मिळत आहे. बाजारात हा रानमेवा अजूनही हवा त्या प्रमाणात दाखल होत नसून, दरही चढेच आहेत. फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्यापेक्षाही रानमेवा महाग विकला जात आहे. पूर्वी अगदी सहज रित्या आणि खूपच कमी किंमतीत मिळणारी ही फळे आता चांगलाच भाव खात आहेत. यामुळे यंदा पिंपरी-चिंचवडकरांना रानमेव्याचा मनसोक्‍त आनंद घेता आला नाही.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. याकाळात जिल्हाबंदीबरोबरच दैनंदिन व्यवहारांवर निर्बंध लादण्यात आले होते. तर करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका राज्यातील ग्रामणी भागालादेखील बसला. मावळ तालुक्‍यातील गावेदेखील त्यातुन सुटू शकली नाहीत. त्यामुळे रानमेवा गोळा करण्याला मर्यादा आल्या. परिणामी, उन्हाळ्याच्या शेवटी मुबलक प्रमाणात होणारा रानमेवा शहरात व मावळातदेखील उपलब्ध नव्हता.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. मावळ तालुक्‍यातील दुर्गम भागातील अनेक कुटुंबे अशा अनेक प्रकारची रानफळे शहरी भागात विक्री करून आपला संसारगाडा चालवित असतात. विशेषत: आयुर्वेदात जांभळांना विशेष महत्त्व असल्याने शहरी भागात जांभळांना तुलनेत अधिक मागणी असते. किलोला दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र यावर्षी कमी उत्पादनामुळे येथील ठाकर समाजाच्या नागरिकांचे अर्थचक्र बिघडले आहे.

काही दिवसांपासून हा रानमेवा थोड्याफार प्रमाणात उपलब्ध झाला तरी करोनाच्या निर्बंधामध्ये शहरी भागात या रानमेव्याची विक्री कशी करायची ही समस्याही येथील रानमेवा विक्रेतांना भेडसावित होती.

चव बदलली
पावसाळ्यात या रानमेव्याच्या फळांमध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच वातावरणातील गारठ्यामुळे फळांची चवही बदललेली असल्याने खवय्यांनासुद्धा बाजारात उशिरा आलेल्या या रानमेव्याची नेहमीची चव मिळू शकली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे हवेत झालेल्या बदलामुळे करवंदे, जांभळ तसेच जंगलातील अन्य रानमेव्यावर मोठा परिणाम झालेला आहे. उत्पादनात 50 टक्केहून अधिक घट तर झालीच आहे. आता पावसाळा सुरु झाल्याने बदललेल्या वातावरणामुळे ही फळे अजूनही परिपक्‍व झालेली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.