पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पुणे परिसरातच उत्सव कालावधीत 40 ते 50 लाख नारळांची विक्री होण्याचा अंदाज आहे. गणेशोत्सवात सुरू होणार असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून 25 ते 30 टक्क्यांनी मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार 20 ते 40 रुपये आहे.
बाजारात नारळांना मागणी वाढली असून, भाव किंचित वाढले आहेत. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज चार ते पाच हजार पोती नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात शंभर नारळ असतात. दररोज तीन ते साडेतीन लाख नारळ बाजारात किरकोळ विक्रीसाठी पाठविले जातात. तोरणासाठी नवा नारळ वापरला जातो. तामिळनाडूतून नव्या नारळाची आवक होत असल्याचे व्यापारी दिपक बोरा यांनी सांगितले.
वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच नारळ काढणीसाठी लागणारे मजूर लवकर मिळत नाही. त्यामुळे मजुरीत वाढ झाली आहे. बाजारात सणांमुळे मागणी जास्त आहे. त्यामुळे नारळाचे भाव काहीसे वाढले आहेत. – दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केट यार्ड
हॉटेल व्यावसायिकांकडूनही मागणी
गणेशोत्सवात भक्तिभावाने भाविक “श्रीं’ना तोरण अर्पण करतात. तोरणासाठी तामिळनाडूतील नारळाचा वापर केला जातो. हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते. तामिळनाडूतून नवा नारळाची आवक होते. आंध्र प्रदेशातून पालकोल नारळाची, तर कर्नाटकातून सापसोल आणि मद्रास नारळाची बाजारात आवक होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील नारळाचे शेकड्याचे भाव
प्रकारभाव (रुपयांत)
नवा नारळ 1,300 ते 1,450
पालकोल 1,325 ते 1,450
सापसोल 1,700 ते 2,400
मद्रास 2,350 ते 2,500