- पर्यटकांना वेसण लावण्याची स्थानिकांची मागणी
- पर्यटन बंदीचा आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा
पवनानगर – पर्यटन बंदीचा आदेश झुगारून पवनमावळात रविवारी (दि. 4) पर्यटकांनी गर्दी केली. पर्यटनस्थळावर बंदी असतानाही दिवसभर गड-किल्ल्यांवर भटकंती केली. धक्कादायक बाब म्हणजे पवन मावळातील तिकोणा गडावरील दरवाजा तोडून पर्यटक गडावर गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी आणि दुर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पवनमावळसह मावळ तालुक्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन बंदीचा आदेश लागू केला असला तरी या आदेशाला रविवारी पर्यटकांनी केराची टोपली दाखविली. शनिवार व रविवारी मावळ तालुक्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांनी बंदी असली तरी रस्त्यावरून जाता येत असल्याने किमान पवना धरण, गडकिल्ले परिसर, भुशी धरण व लायन्स पॉइंट दूरून का होईना पाहता यावा याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती.
मावळ तालुक्यातील अल्हाददायक वातावरण व दरीमधून अलगतपणे वाहणारे धुके हा नजारा पाहण्यासाठी पर्यटक पवन मावळ, आंदर मावळ, लोणावळा परिसरात गर्दी करीत असतात. यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मावळ परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बजावले होते. या आदेशानुसार पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार महिन्यांपासून या आदेशाचे पालन करीत पर्यटकांना पर्यटनस्थळ परिसरात जाण्याच मज्जाव केला होता.
अनलॉक चारमध्ये केंद्र व राज्य शासनाने नागरिकांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास परवानगी दिल्याने तसेच पासची अट रद्द केल्याने नागरिक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ लागले आहेत. यामुळे पर्यटनबंदी असली तरी नागरिकांना व पर्यटकांना बिनधास्तपणे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर जाणे शक्य झाल्याने सलग तीन सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने मावळ तालुक्यात दाखल झाले होते.
यामुळे शहरातील सर्व रस्ते, मुंबई, पुणे राष्ट्रीय महामार्ग, पवन मावळातील रस्ते परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली होती. एकीकडे नागरीक आपल्या भागात करोनाचे प्रमाण कसे कमी होईल यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आज पर्यटकांना मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने स्थानिक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.