पुणे/ केतकावळे/सासवड – पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे दिवे घाटाच्या माथ्यावर हॉटेल व्हिक्टोरिय इन इव्हिनिंगमध्ये सुरू असलेल्या कॅसिनोवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 33 लाख 94 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे पोलिसांनी शहरात जुगार आणि तत्सम काळ्या धंद्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ग्रामीण भागाकडे या अवैध व्यवसायिकांनी आपला मोहरा वळवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजवर दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदरमध्ये कॅसीनोवर धाड पडल्याचे वृत्त पसरताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हॉटेल मालकासह 30 जणांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान हॉटेल मालकाच्या छातीत दुखु लागल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 29 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे उपनिरीक्षक अर्जून मोहिते यांना सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना झेंडेवाडी हद्दीतील हॉटेल व्ही. के. मध्ये तिसऱ्या मजल्यावर कॅसिनो सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
एटीएस पथकाला या ठिकाणी छापा टाकण्यासाठी मदत करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी त्यानुसार सासवड पोलिस आणि एटीएसने छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावर 3 वेगवेगळ्या टेबलांवर जुगार आणि कॅसिनोवर 29 जण खेळत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.