नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून करोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आताच्या घडीला करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, अद्याप धोका अजूनही तसाच आहे. त्यातच करोनाच्या प्रादुर्भावातून सावरलेल्या केरळमध्ये आणखी एका नव्या व्हायरसने एंट्री केली आहे. त्यामुळे केरळ प्रशासनासोबतच देशाच्या आरोग्य यंत्रणेला धडकी भरली आहे.
केरळमधील कक्कनाड येथील एका खासगी शाळेत काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालातून त्यांना एका नव्या व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या वैद्यकीय अहवालातून त्यांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कक्कनडचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी याविषयी माहिती दिली. खाजगी शाळेतील प्राथमिक वर्गातील मुलांमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. संसर्गाची लक्षणं आढळल्यानंतर इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरीमधील 62 विद्यार्थ्यांचे आणि काही पालकांचे नमुने राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सोमवारी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन नमुन्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचबरोबर तीन मुलांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी यावेळी म्हणाले की, नोरोव्हायरसची लागण झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक नाही. दरम्यान, उद्रेक झाल्यानंतर, शाळेनं इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आणि जनजागृतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. ऑनलाईन जनजागृती वर्ग आयोजित केले जात आहेत.
अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या शाळेत संसर्ग पसरला आहे. त्या शाळेतील वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यात आली आहेत. तसेच, लक्षणं दिसणाऱ्यांना तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जनतेने दक्ष राहावे आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ असावेत, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. योग्य उपचार आणि खबरदारी घेतल्यास हा आजार कमी वेळात बरा होऊ शकतो, असं जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांच्या निवेदनात म्हटले आहे.