बारामती – महानायक बिग बी अमिताभ बच्चन आणि सिंघमफेम अजय देवगण शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये दाखल झाले. बारामती विमानतळावर अचानक हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन नायक उतरल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. अमिताभ बच्चन व अजय देवगण यांना एकत्र पाहिल्यावर अनेकांना विश्वासही बसत नव्हता.
बारामती विमानतळावर एका चित्रपटातील प्रसंगाचं चित्रिकरण होणार होते. यासाठी दोघेही बारामती विमानतळावर आले होते. दोघेही येणार असल्याची कल्पना काही मोजक्या लोकांनाच होती. शुक्रवारी सकाळी खासगी विमानाने बिग बी बच्चन आणि अजय देवगण बारामती विमानतळावर उतरले. चित्रपटातील शूटिंगमध्ये ते एका हेलिकॉप्टरमध्ये बसून ते विमानतळावर उतरतात आणि उतरल्यानंतर अभिवादन करतात, असा तो प्रसंग होता.
शूटिंग केलेला प्रसंग कोणत्या चित्रपटातला होता, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. शूट आटोपल्यानतंर दोघेही पुन्हा मुंबईला परतले. बच्चन व देवगण यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, शुभांगी पवार आदींनी केले. त्यांनी काही वेळ दोघांशी संवादही साधला.
हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे दोन कलाकार बारामतीत विमानतळावर शुटींगसाठी येणार आहेत, याची कल्पना कोणालाच नव्हती. विमानतळावर उपस्थितीत मोजक्या लोकांनाच बिग बींसमवेत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. ही बातमी समजल्यावर लोकांनी विमानतळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत शुटींग आटोपून हे दोन्ही अभिनेते मुंबईकडे विमानाने रवाना झाले होते.