नगर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी असल्याचे सांगत नगर शहरात दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत लुटले. ही घटना शहरातील गंगा उद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत शनिवारी (दि.20) रोजी दुपारी घडली. अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याकडील एक लाख 20 हजार 200 रुपये हिसकावून पोबारा केला.
याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी (रा. श्रमिक नगर, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुंकी यांची नगर एमआयडीसी येथे बालाजी इंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. ते शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीवरून गंगा उद्यान परिसरातून जात होते. याचवेळी अज्ञात दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी सुंकी यांची दुचाकी थांबविली व आम्ही एलसीबीचे कर्मचारी आहोत, असे सांगत दुचाकी तेथील मोकळ्या जागेत घेण्यास सांगितले. सुंकी यांनी दुचाकी मैदानाकडे नेली. मैदानात गेल्यानंतर या दोघांनी सुंकी यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून नेले. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोळंके हे करत आहेत.