तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – यशवंतनगरमधील यशोधाम हॉलमध्ये योगशिक्षक संगीता शिंदे यांनी महिलांना मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे धडे दिले. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यशोधाम हॉलमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शशिकला कारके, अर्चना काटे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. ५० हून अधिक महिलांनी शिबिरात सहभाग नोंदवून योगाचे धडे घेतले. योगशिक्षिका शिंदे यांनी ‘शरीर आणि मन’ यांची एकमेकांशी सांगड घालून जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले.
दररोज योग केल्याने शरीराला आणि मनाला लागणारी शिस्त, योगातील सातत्याचे महत्त्व प्रशिक्षणार्थीना पटवून दिले. ओंकार साधना, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायामाची प्रात्यक्षिक करवून घेत योगशास्त्र, आहारशास्त्राचे महत्त्व पटवून दिले.
योग सप्ताहाच्या सांगताप्रसंगी शांतीपाठानंतर शिंदे यांनी प्रशिक्षणार्थीना सूर्य नमस्काराविषयी पुस्तक मोफत भेट दिले. शिबिरासाठी विशेष सहकार्याबद्दल माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांची श्रीफळ, गुलाबाचे रोपटे देऊन कृतज्ञता व्यक्त केली.