साउदम्पटन – करोनाचा धोका संपल्यावर पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर आता सुरू झालेल्या आयसीसी वर्ल्ड सुपर लीग स्पर्धेतील सलामीच्या लढतीत इंग्लंडने आयर्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड विलीने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर आयर्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला.
या विजयाच्या जोरावर इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी सरशी झाल्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय लढतीतही आपले वर्चस्व राखले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. हा निर्णय सार्थ ठरवताना विलीने सुरुवातीपासूनच भेदक मारा केला. कर्टिस कॅम्फेरचे अर्धशतक, ऍण्डी मॅकब्रायनच्या 40 धावा, केवीन ओब्रायन व गॅरेथ डेनली यांच्या प्रत्येकी 22 धावांच्या खेळीनंतरही अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने आयर्लंडचा डाव 172 असा रोखला गेला. विलीने 30 धावांत 5 गडी बाद केले तर त्याला योग्य साथ देताना सकिब महंमदने 36 धावांत 2 गडी बाद केले.
विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डावही सुरुवातीला अडखळला. एकवेळ 4 बाद 78 अशी स्थिती झाल्यानंतर मात्र, सॅम बिलींगने नाबाद 67 व इयान मॉर्गनने नाबाद 36 धावांची खेळी केली. या जोडीने 5 व्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी करत संघाचा विजय साकार केला. या विजयाच्या जोरावर इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड सुपर लीग स्पर्धेत गुणांचे खाते उघडले व 10 गुणांची कमाई केली. आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगला प्रारंभ केला असून आता या स्पर्धेतून पात्र ठरणारे संघ 2023 साली भारतात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत यजमान भारतीय संघासह या स्पर्धेतील सात संघ पात्र ठरतील. भारतीय संघाला थेट प्रवेश असेल. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील विजयासाठी 10 गुण देण्यात येणार असून बरोबरी किंवा अनिर्णित सामन्यासाठी प्रत्येकी 5 गुण बहाल केले जातील.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड – 44.4 षटकांत सर्वबाद 172 (कर्टिस कॅम्फेर नाबाद 59, ऍण्डी मॅकब्रायन 40, केविन ओब्रायन 22, गॅरेथ डेनली 22, डेव्हिड विली 5/30, सकिब महंमद 2/36). इंग्लंड – 27.4 षटकांत 4 बाद 174. (जेम्स विन्स 25, जेसन रॉय 24, सॅम बिलींग नाबाद 67, इयान मॉर्गन नाबाद 36, क्रेग यंग 2/56).