ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले.
अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
तडकाफडकी नोटीस बजावल्यानंतर ठाणे खंडणी विभागाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याप्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावर अविनाश जाधव म्हणाले, मी गेली अनेक वर्षे लोकांसाठी आंदोलन करत आहे. कोणतेही आंदोलन मी स्वत:साठी केलेले नाही. वसईतही जे आंदोलन केले होते ते कोव्हिड सेंटरसाठी होते. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरू असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे, असे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत सांगितले.