नवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विमानाचे भोपाळच्या राजा भोज एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज बंगळूरूहून दिल्लीकडे जात होते. त्यावेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयीचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, बंगळूरुमध्ये विरोधकांच्या दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक काँग्रेसने होस्ट केली होती. राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी यांचीही या बैठकीला उपस्थिती होती.
बैठक आटोपून सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिल्लीकडे जात असतांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचे भोपाळमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.