पूंछ – जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्कराने चौकशीसाठी बोलावलेल्या तीन जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर एका ब्रिगेडियरसह तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच लष्कराने या प्रकरणाची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. संबंधित घटनाक्रमात एका ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
पूंछमधील सुरनकोट भागातील ढेरा की गली आणि बाफलियाज दरम्यानच्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर सुरणकोट पट्ट्यातील प्रभारी ब्रिगेडियर स्तरावरील अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून संबंधित युनिटच्या इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अफवा पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण करण्यापासून गैरप्रकारांना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी तिसऱ्या दिवशीही पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लष्करप्रमुखांनी दिली भेट
पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनदरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी ग्राऊंड झिरोला भेट दिली. या भेटीत त्यांनी कमांडर्सशी संवाद साधत सर्च ऑपरेशनबाबत माहिती घेतली.
तसेच पूंछ सेक्टरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. जनरल पांडे यांनी ढेरा की गलीला भेट देत सुरनकोट आणि राजौरी जिल्ह्यातील थानामंडी वनपट्ट्यातील दहशतवादविरोधी मोहिमेचा आढावा घेतला.